|
|
बस्सपा तेलीचे दारिद्रय संपले |
|
श्रीस्वामीसुत महाराजना स्वामीकृपेची प्रचिती |
|
श्री शेषाचार्य अग्निहोत्री यांची
वैराग्याची परीक्षा |
|
श्रीगुरुलीलामृत रचयीता वामनबुवांची गोष्ट |
|
|
बस्सपा तेलीचे दारिद्रय संपले |
मंगळवेढा गावामध्ये स्वामी असताना त्या गावात बसप्पा तेली नावाचा एक गृहस्थ रहात होता. तो अत्यंत गरीब होता. दिनरात तो स्वामी महाराजांची सेवा करी.
अठराविश्वे दारीद्रय, गरीबी तरीही त्याने आपली गरीबी कधीच स्वामींपुढे सांगितली नाही. करुणामय स्वामी माऊली सारे जाणणारी..!!
एका संध्याकाळी स्वामी उठले आणि झपाझप पावले टाकीत काठवण नावाच्या दाट अरण्यात शिरले. अशा भयानक ठिकाणीही बस्सपा न घाबरता स्वामी बरोबर राहीला.
अचानक तेथे लहान मोठे साप उत्पन्न झाले. व बस्सपाच्या दिशेने धाव घेऊ लागले. बस्सपा पूर्ण घाबरला....स्वामी म्हणाले, भिऊ नकोस. तुला दारीद्रया पासून सुटावयाचे आहे ना....?
तर मग यांतले हवे तेवढे साप उचल, आणि घरी घेऊन जा. पुन्हा अशी संधी येणार नाही. स्वामी आज्ञेनुसार त्याने घाबरत घाबरत काही साप आपल्या कांबळीत घातले.
तसे सगळे साप अदृश्य झाले. स्वामी म्हणाले, तुझ्या झोळीत धन आहे. ते सांभाळून घरी घेऊन जा. सुखाने संसार कर.
घरी गेल्यावर घाबरत घाबरत त्याने गाठोडं उघडून पाहिले. समर्थांच्या किमयेने त्या सापाचे सोने झालेली लगड बस्सपाला दिसली.
ते पाहून दोघांही पतिपत्नीना गहिवरुन आले.आता त्यांचे दारिद्रय संपले होते.त्यांनी स्वामींचे आभार मानले.
|
श्रीस्वामीसुत महाराजना स्वामीकृपेची प्रचिती |
श्रीस्वामी महाराजांची पूर्णकृपा लाभलेले व त्यांचे जन्मजन्मांतरीचे सेवक असणारे श्रीस्वामीसुत महाराज हे फार विलक्षण विभूतिमत्व होते.
श्री. हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत हे मुंबई म्युनिसिपालिटीमध्ये नोकरीला होते. त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले. पण पुढे श्रीस्वामीकृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली. त्यावेळी पंडितांनी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला. आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले. ही स्वामीकृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले.
श्रीस्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की, "तू कुळावर पाणी सोड व माझा सुत (पुत्र) हो!" झालेल्या फायद्यातील तीनशे रुपये त्यांनी सोबत आणले होते, त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या. त्या पादुका मोठ्या प्रेमाने त्यांनी सलग चौदा दिवस वापरल्या. अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात, अशी इच्छा होती, पण स्वामींनी प्रसन्नतेने आपल्या हात, पाय, तोंड वगैरे अवयवांस लावून त्या पादुका श्रीस्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या. स्वत: श्रीस्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत. त्यांनी स्वामीसुतांना तो प्रसाद देऊन, " तू तुझे घरदार, धंदा सोडून दर्याकिनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर !" अशी आज्ञा केली.
त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्रीस्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला व उशाखालची छाटी व कफनी अंगावर फेकून कृपा व्यक्त केली. श्रीस्वामीसुतांनी श्रीस्वामीआज्ञेचे तंतोतंत पालन करून आपला संपूर्ण संसार, घरदार लुटवले. बायकोचे दागिनेही ब्राह्मणांना दान करून टाकले. त्याकाळात ते दागिने जवळपास शंभर तोळ्यांचे होते. अंगावर मणी मंगळसूत्र देखील ठेवले नाही. स्वत: भगवी कफनी नेसले व बायको ताराबाईला पांढरे पातळ नेसायला लावून स्वामीसेवा सुरु केली. अत्यंत निस्पृहपणे व वैराग्याने त्यांनी खूप मोठे स्वामी सेवाकार्य केले. हजारो लोकांना स्वामीभक्तीस लावले. सुरुवातीला त्यांचा मठ कामाठीपु-यात होता, नंतर तो मठ कांदेवाडीत स्थलांतरीत झाला. (श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका देखील सुरुवातीला याच कांदेवाडी मठात होत्या. कालांतराने त्या मुंबईतील चेंबूर येथील मठात नेण्यात आल्या. तेथे सर्वांनी आवर्जून दर्शन घ्यावे.) स्वत: श्रीस्वामींनी अनेकांना दर्याकिनाऱ्यावर जाऊन स्वामीसुतांचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केलेेली होती.
श्रीस्वामी महाराजांच्या प्रकटदिनाच्या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या उत्सवाची परंपरा श्रीस्वामीसुतांनीच प्रथम शके १७९२ म्हणजेच १८७० साली सुरू केली. अक्कलकोट येथे त्या पुढील वर्षीपासून स्वामींच्या समक्षच हा उत्सव होऊ लागला. महाराज अतीव प्रेमाने स्वामीसुतांना " चंदुलाल " म्हणत असत. अनेक भक्तांना ते मनोकामना पूर्तीसाठी दर्याकिनाऱ्यावर स्वामीसुतांकडे पाठवत असत.
श्रीस्वामींनी आपल्या पश्चात् स्वामीसुतांना आपले कार्य पाहण्यासाठी अक्कलकोटला पाचारण केले, पण श्रीगुरूंच्या नंतर आपण राहू शकणारच नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. अनेक लोकांना स्वामींनी मुंबईला पाठवले स्वामीसुतांना घेऊन येण्यासाठी. पण शेवटपर्यंत ते श्रीस्वामींसमोर आलेच नाहीत आणि त्यांनी मुंबईतच देहत्याग केला. त्यावेळी स्वामींनी अक्कलकोटात विपरीत लीला करून स्वामीसुतांवरील आपले परमप्रेम प्रकट केले. स्वत: श्रीस्वामी महाराजांनी स्वामीसुतांच्या मातु:श्री काकूबाईंचे हरप्रकारे सांत्वन केले. स्वामी महाराजांचे आपल्या या अनन्य सुतावर विलक्षण प्रेम होते.
श्रीस्वामीसुत महाराज खूप छान भजन करीत असत. त्यांच्या अभंगरचनाही उत्तम आहेत. ते ज्या ज्या लीलांचे वर्णन करीत त्या त्या लीला स्वामी महाराज प्रत्यक्ष करून दाखवीत असत. श्रीस्वामीसुतांनी रचलेला ३१ अभंगांचा ' श्रीस्वामीपाठ ' अत्यंत बहारीचा असून खूप प्रासादिक आहे, खूप भक्तांना त्याच्या पठणाचे अद्भुत अनुभव आजही येत असतात ; ही स्वामीसुतांवरील श्रीस्वामीकृपेचीच अलौकिक प्रचिती आहे.
|
श्री शेषाचार्य अग्निहोत्री यांची
वैराग्याची परीक्षा |
श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला असताना घडलेली ही घटना. श्री स्वामींचे एक शिष्य श्री शेषाचार्य अग्निहोत्री हे ही श्री स्वामींच्या सेवेत होते. हे स्वतः देखील अध्यात्मात बरीच उच्च अवस्था प्राप्त केलेले एक अधिकारी पुरुष होते.
श्री स्वामींसाठी नैवेद्य म्हणून भक्तगण, रोज पेढे, बर्फी, मिठाई वगैरे जिनसा ठेवत असत. स्वामी ते सर्व भक्तांमध्ये वाटत. परंतु शेशाचार्यांना स्वामी कधीच पेढे, बर्फीचा प्रसाद देत नसत. शेषाचार्यांना नेहमी वाटे की, आज स्वामी प्रसाद देतील, आज देतील. पण छे! समर्थांनी त्यांची परीक्षाच घेण्याचे मनाशी पक्के केले होते. एक दिवस शेषाचार्यांनी श्री समर्थांजवळ प्रसाद देण्याची विनंती केली. परंतु विनंती करूनही श्री समर्थांनी शेषाचार्यांना प्रसाद दिला नाही. शेषाचार्य हिरमुसले झाले.
परंतु; त्या दिवसापासून श्री स्वामींनी शेषाचार्यांना दर्शन देण्याचे पूर्ण बंद केले. शेषाचार्य दर्शनास आले म्हणजे श्री समर्थांनी डोक्यावर पांघरून घेऊन झोपावे. अशाने शेषाचार्यंना श्री समर्थांचे दर्शन मिळेना. असे अनेक वेळा झाले.
शेषाचार्यांना श्री स्वामींच्या अशा अघटीत कृतीचा काही केल्या अर्थच लागेना. ते सतत विचार करीत होते.
एक दिवस शेषाचार्य शेणाच्या गोवऱ्या करीत बसले होते. मनोमन श्री स्वामींचाच विचार चालू होतं. विचार करता करता एकदम त्यांना आठवले की, त्यादिवशी आपल्याला पेढ्याचा मोह अनावर होऊन आपण श्री स्वामींकडे प्रसादाची मागणी केली. ते समर्थांस आवडले नसावे. "भगवी वस्त्रे धारण करून मोहात फसणे बरे नाही अशाने, त्या वस्त्रांची म्हणजेच वैराग्याची विटंबना केल्यासारखे होते" हेच श्री स्वामींना आपल्याला सुचवायचे आहे म्हणून त्यांनी मला दर्शन देणे बंद केले असावे. हा विचार करून त्यांचे मान उचंबळून आले. नकळत आपल्या हातून घडलेल्या चुकीची त्यांना जाणीव झाली.
त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून, गोवऱ्या करता करता शेणाचा एक गोळा त्यांनी स्वतःच्या मुखात घातला व श्री समर्थांची अगदी कळवळून क्षमा मागितली. झाले!
दुसर्या दिवशी शेषाचार्य दर्शनास गेले असता श्री स्वामींनी त्यांना दर्शन दिले व हसत हसत म्हणाले, " शेषा, पोटभर पेढे खाल्लेस ना!" श्री स्वामींचे हे उद्गार ऐकताच शेषाचार्य मनोमन खजील झाले व त्यांच्या मनी जी काही उरलीसुरली मोहाची बंधने होती, ती देखील पूर्णतः गळून पडली.
स्रोत : श्री स्वामींचे शिष्य श्री गोपाळबुवा केळकर लिखित श्री स्वामींच्या "बखरी"तून.
|
श्रीगुरुलीलामृत रचयीता वामनबुवांची गोष्ट |
चोळप्पा वामन बुवांची स्वामींशी भेट घडवतात. स्वामी म्हणतात:- " वामना! इतक्या नोकऱ्या धरल्या सोडल्या, आता आमची नोकरी धर. ब्रह्मनिष्ठ हो." वामन बुवा सहमती देतात.
सुंदराबाई चोळप्पांना स्वामी सेवेसाठी आलेले पैशे आपल्या कुटुंबासाठी पण वापरत जा अशी दिशा भूल करते, चोळप्पांना ते पटत नाही पण सुंदर बाईच्या शब्दांना भुलून ते काही पैशे कुटुंबासाठी वापरतात. पण त्यांचच मन त्यांना खातं. त्याचं दडपणाखाली ते वावरतात,.
वामनबुवा स्वामी कडे आपल्या कुलदेवी नाशिकची सप्तशृंगी च्या दर्शनाला जायची अनुमती मागतात. स्वामी अनुमती देतात. मग बाळप्पांना म्हणतात- "ह्याला म्हणतात, 'काखेला कळसा आणि गावाला वळसा' ! " देवीच्या मंदिरात ते पुजाऱ्याला देवीतल्या मुखातला विडा प्रसाद म्हणून मागतात, पुजारी स्पष्ट नाकारतात. वामन बुवा मनो-मन प्रार्थना करतात:- " जर देवीची माझ्या कुळा वर कृपा आहे तर देवीच्या मुखात ला विडा माझ्या हातात पडावा."
इकडे स्वामी म्हणतात:- " अरे किती हट्ट करणार,आणि आम्ही किती हट्ट पुरवायचे." बाळप्पांनी दिलेला विडा स्वामी तोंडात घालतात आणी तिकडे देवीच्या मुखातला विडा वामन बुवांच्या हातात पडतो. हे पाहून,पुजारी सुद्धा चकित होतो.
चोळप्पाला स्वामी म्हणतात:-"मनात चोर असला कि भीती वाटते.तुला सर्व कळतं पण वळत नाही." "मनुष्य आपली चूक लोकांपासून लपवू शकतो पण देव आणि गुरु पासून नाही."
"चोळप्पा स्वताला फसवू नको."
देवी दर्शना नंतर वामनबुवा पंढरपूरला पांडुरंग दर्शनाला जातात. तिथे पांडुरंगाच्या मूर्तीत त्यांना स्वामी पांडुरंग रुपात दिसतात. तीर्थयात्रा आटपून वामन बुवा स्वामी दर्शनाला येतात. स्वामी म्हणतात-" काय वामना! झाली मनसोक्त तीर्थ यात्रा." " अरे पण हातात विडा आम्हाला द्यावा लागला.पांडुरंगाला जी गंगा अर्पण केली ती आम्ही ग्रहण केली."
"अरे कशाला वण-वण फिरतो. परमानंदात राहा " "ईश्वराचं रूप नाही स्वरूप ओळखा ,भक्तीची ताकद एवढी वाढवा कि भगवंताला तुमच्या कडे यायल पाहिझे." "देवाला हृदयात ठेवा तेव्हा तो तुम्हाला त्याच्या हृदयात स्थान देईल."
वामन बुवा गहिवरून म्हणतात:- "स्वामी आपल्या लीला अगाध आहे!" "त्यांना शब्दबद्ध करुन ग्रंथ लिहू इच्छितो." स्वामी स्मितमुद्रेनी म्हणतात:- "तुझी इच्छा पूर्ण होईल. माझा आशीर्वाद आहे." पुढे वामन बुवा स्वामीलीलेंवर ग्रंथ लिहितात ,हाच ग्रंथ श्रीगुरुलीलामृत म्हणून साकार होतो.
|
कोटणीसाना साक्षात जगदंबेची मूर्ती दिसू लागली |
श्री हणमंतराव कोटणीस हे सांगलीचे ख्यातनाम वकील आणि जगदंबेचे निस्सीम भक्त. त्यांची भक्ती जगदंबेच्यापायी एवढी विनटली होती की तिला सोडून इतर कोणालाही नमस्कार करायचा नाही असा त्यांचा दंडक होता.
एकदा वकिलीच्या काही कामानिमित्त ते अक्कलकोट गावात आले.कर्नोपकर्णी त्यांनी स्वामींची कीर्ती ऐकली होती. घरातून निघताना त्यांच्या कुटुंबाने त्यांना “परतताना स्वामींचा प्रसाद घेऊन या” असेही सांगितले होते आणि आपल्या वकिली थाटात कोटणीसानी आपल्या कुटुंबाची खिल्लीही उडवली होती.
काम संपवून आता उदया सांगलीस निघायचे. संध्याकाळी मोकळा वेळ होता. कोटणीस पाय मोकळे करावयास फेरफटका मारावयास निघाले. “जाउन तर बघूया, काय प्रकार आहे?” ह्या विचाराने मठात शिरले.
तिन्हीसांजेची वेळ होती, स्वामी वटवृक्षाखाली डोळे बंद करून पहुडले होते. आणि कोटणीसांचा मठात प्रवेश झाला. दर्शन झाले पण कोटणीस पाया पडायला तयार नव्हते. तेवढयात कोणीतरी त्यांना स्वामींना नमस्कार करावयास सुचवले आणि कोटणीसानी खंबीरपणे नकार दिला.
स्वामी तश्याच डोळे बंद असलेल्या स्थितीत म्हणाले ” अरे कोटणीसा ! अश्या नियमांनी आपलीच अडचण होते बरे. असा भेदभाव करू नये रे! आणि मला एक सांग तुझी ती जगदंबा दिसते तरी कशी?” असे म्हणून स्वामी उठून बसले. डोळे बंदच.
कोटणीसाना समोर साक्षात जगदंबेची मूर्ती दिसू लागली. बरेच वेळा डोळे चोळूनही समोरची मूर्ती काही हलेना. कोटणीस आपले भान हरपून बघतच राहिले.
जरा वेळाने भानावर येऊन त्यांनी स्वामीना साष्टांग नमस्कार घातला. आणि मठातून बाहेर पडू लागले. तेवढयात स्वामीनी त्यांना मागूनच हाक मारली आणि माघारी बोलावले.
कोटणीस येताच त्यांना हात पुढे करावयास सांगून समर्थांनी आपला हात त्यांच्या हातावर ठेवला. आणि म्हणाले “घरी माझ्या प्रसादाची कोणतरी वाट बघतेय ना! हा घे !!”
प्रसादासाठी पुढे केलेल्या कोटणीसांच्या ओंजळीत भंडारा होता. कोटणीस निशब्द झाले होते.
...source
|
|
|
|
|
|
|
|